Posts

आकडी

Image
  ज्वारी काढली कि तिच्या चार पाच कणसांची अशी "आकडी" करून, घराच्या आणि गावातील देवळाच्या वळचणीवर किंवा उंच ठिकाणी बांधतात. जेणेकरून पावसाळ्यापर्यंत बिजाहारी पक्ष्यांना थोड्या फार प्रमाणात खाद्य उपलब्ध होते. #tradtionalpractices #social #belief #ecology

Nature Mimicking

Image
काचेची बाटली आणि लोखंडी सळीच्या मदतीने गुरांच्या गळ्यातील घंटीच्या आवाजाची नकल करणे असो किंवा शेतात ठिकठिकाणी काठीवर सफेद रंगाची पिशवी अडकवून इतर पक्षी/माणसे बसल्याचा भास निर्माण करणे असो. शेतकऱ्यांनी बुजगावन्याव्यतिरिक्त अश्या इतर मार्गांचा वापर पक्षांना/प्राण्यांना शेतातील पिकापासून दूर ठेवण्यासाठी केलेला दिसतो. #nature #mimicking #farmer

करसाळ्याची बैलगाडी - नैसर्गिक Lego

Image
ज्वारी काढल्यानंतर उरलेल्या भागाच्या पेंढ्या बांधून त्या पावसाळ्यापर्यंत गुरांना चारा म्हणून वापरल्या जातात, त्याला 'कडबा' म्हणतात. त्यातलाच देठाचा भाग म्हणजेच 'करसाळ'; जे उन्हाने सुकले कि त्यापासून विविध वस्तू बनवता येतात. सरळ लांब सडक करसाळ शोधून आपल्याला हव्या त्या आकारात कापता येतो, त्याच्या सालेचा भाग अतिशय लवचिक असतो. जो गोलाकार वस्तू साठी किंवा दोन भागांना जोडण्यासाठीही वापरता येतो. मधला भाग थर्माकोल सारखा मऊ आणि तितकाच कठीण असतो, जो ब्लेडने हव्या त्या आकारात कापता येतो. आणि शेवटी वापरावे लागतात ते बाभळीचे काटे, जे एखाद्या टाचणीसारखे काम करतात. वेगवेगळ्या भागांना घट्ट जोडून ठेवतात. अशी सर्व सामग्री रानातून गोळा करून काही तासांच्या खटाटोपीनंतर तयार होती ती हि करसाळ्याची बैलगाडी. लहान मुलांसाठी विविध सुटे भाग एकत्र जोडून काहीतरी आकार तयार करता येणारे खेळ आणि खेळणी बाजारात विविध नावाने येतात, बहुतेक खेळणी हि प्लास्टिकचीच असतात. लेगो हा त्यातला प्रसिद्ध खेळ. हे करसाळ पण एक प्रकारचं नैसर्गीक लेगोच म्हणता येईल, नाही का? #करसाळ #natural #toys #lego

परडी

Image
मार्च महिना म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवटचा आणि शहरी भागासाठी महत्वाचा महिना. शेतीप्रधान ग्रामीण भागासाठीही तितकाच महत्वाचा. मराठी वर्षानुसार फाल्गुन, ज्यात होलिका दहन (होळी) म्हणजेच शिमगा सण येतो, धुळवड येते. म्हणूनच #शिमग्याचा_महिना अशीही याची ओळख. शेतकऱ्यांसाठी देखील तो महत्वाचा, कारण याच वेळेला, रब्बी हंगामात घेतलेली पिकांची काढणी होते. ज्वारी हे त्यातलं प्रमुख पीक. ज्वारीची भाकरी ही ग्रामीण भागाच्या आहारातला आणि खाद्य संस्कृतीतील एक अविभाज्य भाग आहे. ज्वारीची कणसं कापली की उरलेल्या ताटाच्या पेंढ्या बांधून गंजी रचतात. हाच गुरांना वर्षभर दिला जाणारा पौष्टिक चारा किंवा कडबा! #परडीचा_नैवेद्य याच शिमग्याच्या महिन्यात एक महत्वाची प्रथा ग्रामीण भागात पाहायला मिळते. ज्यात शेताला पाणी देणाऱ्या नैसर्गिक जल स्रोतांना नैवेद्य दाखवला जातो. ही त्या स्रोतांच्या प्रती असलेली कृतज्ञता म्हणा किंवा एक प्रकारे जल समृद्धीसाठी केकेली प्रार्थना सुरुवातीला कडब्याच्या दोन दोन ताट्या घेऊन त्या उभ्या, आडव्या आणि तिरप्या बांधून त्याची चौकट तयार केली जाते. ताट्या जिथं जिथं एकमेकांना बांधलेल्या असतात, अशा सांध्य...

कुठलं वावर?

Image
बाराबीग्यातली #भाकरी , खचरातला #भात , मुळव्यातली #भाजी आणि कुंदडकितला कांदा, लसूण घालून केलेले घेवड्याचं #कालवण . हे आहे आमच्या जेवणाच्या ताटातल्या अन्न आणि शेतांच मॅपिंग. आपण खात असलेल्या ताटातला प्रत्येक पदार्थ आपल्याच शेतातून येणे यापेक्षा आणखी सुख ते काय. बाकी वरची जी शेतांची विचित्र नावे वाचलीत, त्याचाही काहींना काही अर्थ असतो. गावातल्या प्रत्येक वावराला (शेताला) किंवा शेतांच्या समूहाला नावे दिलेली असतात. बहुतेक नावे पूर्वापार चालत आलेली आहेत. शेताची मालकी कोणाची, तिथला भूभाग, तिथे शेती करण्याआधी काय होते किंवा तिथल्या जागेचा जर एखाद्या धार्मिक, सांस्कृतिक अथवा ऐतिहासिक घटनेशी संबंध असेल तर त्याला तसे नाव दिले जाते. ही तोंडी ऐकिवात नावे ज्या त्या पंचक्रोशीत राहणाऱ्या स्थानिक लोकांना माहित असतात आणि याच नावांनी त्यांना ओळखलं जातं. कुठल्या शेतात काय चाललंय, काय पिकवलय हे या नावांनी सांगणं लक्षात ठेवणं सोप्पं जाते. प्रत्येक नावाच्या मागे काही अर्थ असतोच असे नाही पण बहुतेक नावांच्या मागे काहीना काही कारण आणि अर्थ असतो. 'म्हसोबाच तुकड' म्हणजे म्हसोबाचे देवस्थान आहे म्हणून, ...

पाड लागलाय!

Image
मे महिना जस जसा पुढे सरकतो तसा पोरांच्या नजरा आंब्याच्या झाडाकडे वळू लागतात. आणि मग अचानक एक दिवस असा अर्धवट खाल्लेला आंबा झाडावर किंवा खाली पडलेला दिसला कि पोरं समजून जातात, आंब्याला 'पाड लागलाय'. म्हणजेच त्या झाडाचे #आंबे पिकायला सुरुवात झालीये. तो आंबा खाल्लेला असतो झाडावरच्या खारु ताईने, कारण तिलाच सर्वात आधी कळतं की कुठला आंबा पिकला आहे. हि बातमी वाडीतल्या इतर पोरांपर्यंत पसरली कि तीन चार जणांची वेगवेगळी टोळकी आंब्याच्या आजूबाजूला दिवसभर घुटमळत राहतात. आंब्याचा मालक जवळ नाहीये ना, याची खात्री करून मग हळूच एकजण आंब्यावर चढाई करतो. एखादा पिकलेला आंबा जर आधीच लांबून टिपला असेल तर तो हाताने अलगद काढून खालच्यांकडे दिला जातो. अगदीच जर एखादा शेंड्यात किंवा छोट्या फांदीवर असला कि ती फांदी जोरात हलवून तो आंबा पाडला जातो. कधी कधी नशिबात असल कि आणखी एखाद दुसरा #पिकलेला आंबाहि मिळतो. एखाद्या दिवशी आंब्याचा मालक बाहेरगावी गेलाय अशी जर पक्की खबर असली कि मग पोरांची खालूनच फायरिंग सुरु होते. काहीजण दगडी गोळा करून देतात तर बाकीच्या पोरांची पिकलेल्या आंब्याला दगडाने टिपायची चढाओढ सुरु होत...

पारंपारिक बियाणे - काळाची गरज

Image
मागे कमळगडावर जेव्हा गेलो होतो, तेव्हा तेथील महाबळेश्वर डोंगर रांगा, धोम धरण, गडावरची ५० फूट खोल कावेची विहीर अशी विविध आकर्षणे अनुभवता आलीच पण आणखी एक अजब गोष्ट पाहिली ती म्हणजे कोणत्याही सिंचनाशिवाय घेतले गेलेले गहूचे पीक. कमळगडाच्या पठारी पट्ट्यावर आम्ही पोहचलो आणि बघतोय तर समोर एक हिरवंगार शेत. इतक्या उंचीवर शेती आणि ती हि गहूची? थोडं अनपेक्षितच होतं. इतक्या उंचीवर पाणी कसे दिले जात असेल? नेमका गहूच आहे का? असे प्रश्न डोक्यात चालू असतानाच तिथे राहणारे विनोद काचरे आम्हाला दिसले. त्यांच्याकडून आम्हाला कळले कि हा 'बोटका' जातीचा गहू आहे. अंदाजे 3800 फुटांवर लावलेलं हे पारंपरिक बियाने विनोद काचरे आणि त्यांचं कुटुंब पिढ्यानपिढ्या घेत आले आहेत.  साधारणतः दसऱ्याच्या वेळी म्हणजे थंडीची सुरवात होत असतानाच या पिकाची पेरणी केली जाते. महाबळेश्वरच्या उंच डोंगररांगांमध्ये येणारा कमळगड परिसर, अश्या फक्त दव बिंदूच्या ओलाव्यावर वाढणाऱ्या पिकास अनुकूल आहे. एखादा पाऊस पडला तर पडला, नाहीतर या बोटका बियाणाला न वारंवार पाणी द्यावे लागते, न कोणते रासायनिक खत/किटकनाशकेहि वापरावी लागत....