कमळगडावरील गेरूची विहीर (Step Well)


महाबळेश्वर डोंगर रांगेतील पाषाणपुष्प म्हणून ओळखला जाणारा 'कमळगड' ला भेट देण्याचा योग दोन दिवसापूर्वी आला. या गडावर पोहचण्याचे दोन तीन मार्ग आहेत पण आम्ही आकोशी वरून गडावर चढायला सुरवात केली. दोन तासांच्या पायपीटी नंतर गडाच्या मुख्य प्रवेश द्वारावर असलेली लोखंडी शिडी दिसली. शिडी चढून वर गेल्यावर काही पावलांच्या अंतरावरच जमिनीत कोरलेल्या पायऱ्या नजरेस पडल्या.


या गडावर 'दातेगड'सारखीच विहीर (Step Well) आहे असे वाचले होते त्यामुळे उत्सुकता वाढली. स्थानिक लोक याला गेरूची किंवा कावेची विहीर असेही म्हणतात. विहिरीच्या तोंडापसून ते तळापर्यंत एक तार बांधलेली आहे, तिचा आधार घेत आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. जस जसा खाली उतरत होतो तसा दोन्ही बाजूच्या भिंती आणि पायर्‍यांवरचा ओलावा वाढत गेला. जवळजवळ चाळीस एक पायऱ्या उतरल्यानंतर आम्ही विहिरीच्या तळाशी पोहोचलो. वर उन्हाने तापलेल्या जमीनवर सुकलेले गवत होते तर खाली विहिरीत थंडगार वातावरण आणि दोन्ही बाजूने भिंतीवर लटकलेली हिरवीगार झुडपं आणि शेवाळ होती. तळ भागात दोन्ही बाजूला खोल कपारीत सर्वत्र ओलसर लाल रंगाची माती दिसली. अंदाजे दहा चौरस फूट आकाराच्या गाभ्यात पाणी तसे खूपच कमी होते.



विहिरीचे छत संपूर्णपणे झाकलेले नसल्याने, विहिरीच्या तळाशीही पुरेसा प्रकाश पोहचत होता. नंद (एका बाजूने प्रवेश) प्रकारात मोडणारी हि विहीर पूर्व-पश्चिम बांधलेली आहे आणि तिचे प्रवेशद्वार पूर्वेला आहे. विहिरींची रुंदी अंदाजे ५-६ फूट, लांबी ४० फुटांहून अधिक आणि खोली ५० फुटांपर्यंत असावी. विहिरीच्या डाव्या बाजूला एक छोटे कातळात कोरलेले पाण्याचे टाके देखील होते.




समुद्रसपाटीपासून ४२०० फूट उंचीवर असलेल्या या गडावर इतकी मोठी कातळ विहिर तयार करणे म्हणजे स्थापत्य शास्त्रातील एक अदभूत नमुनाच म्हणावा लागेल. ट्रेकिंगची आवड असलेल्याना हा गड आवडेलच पण इतिहास आणि स्थापत्य कलेत रस असेल्या भटक्यांसाठीहि कमळगड एक पर्वणीच ठरेल.



Comments

Popular posts from this blog

ठाणे ते सातारा सोलो सायकलिंग 🚲

आकडी

Interaction Design Foundation - Your online UX Guru