जुन्या बाटलीत...नवीन तेल!
आधी नारळाचे तेल गोलाकार पत्र्याच्या डब्यात मिळायचं, त्याचा वापर झाला कि ते इतर काही मसाले, सुई - धागे किंवा तश्याच काही छोट्या मोठ्या वस्तू ठेवायला वापरले जायचे. आमच्या जुन्या वाड्यातील घरी स्वयंपाक खोलीत पूर्ण मांडणीच या अश्या डब्यांनी भरलेली असायची. बाजारात नंतर वेगवेगळ्या प्रकारचे हेअर ऑइल प्लास्टिकच्या बाटलीत मिळायला लागले. वेगेवगळे रंग, आकार, सुप्रसिद्ध कलाकारांनी केलेल्या जाहिरातीमूळे आपण अश्या वस्तूंकडे आकर्षित झालो आणि हळूहळू असे तेलाचे डबे घरांमधून हद्दपार झाले.
यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन प्लास्टिक प्रोडक्ट्स हे फक्त दिसायलाच चांगले नाही तर वापरण्याच्या दृष्टीनेहि सहज आणि सोपे होते. ते विविध आकारात मिळत असल्याने कुठेही ठेवणे आणि घेऊन जाणे सोयीचे होते. एकूणच त्यांचा युजर एक्सपेरियन्स चांगला होता. पण कंपन्यांनी वापरून झालेल्या बाटलीचा पुनर्वापरावर लक्ष नाही दिले. यूज अँड थ्रो मॉडेल त्यांना सोयीस्कर होते आणि त्यावर वेगळी अर्थव्यस्थाही चालू झाली होती.
आजही नारळाचे तेल बहुतेक घरांमध्ये वापरले जाते. त्यात पॅराशूट म्हणजे हेअर ऑईल प्रोडक्ट्स च्या दुनियेतला कोलगेट च म्हणायचा. नारळाचे तेलच जर वापरायचे असेल तर मग ते बाजारातून सुट्टेही आणता येऊ शकेल, नाही का? आणि मग आपल्या आधीच्या वापरलेल्या रिकाम्या बाटलीत ते तेल भरून पुन्हा वापरता येईलच कि. अश्या प्रकारे आपण आधुनिक बाटली आणि नेहमीचे तेल असे दोन्ही गोष्टी एकत्र करून वापरू शकतो. एका घरात वर्षभरात नाही म्हटलं तरी डजनभर हेअर ऑइल च्या बाटल्या लागत असतील. विचार करा आत्तापर्यंत आपली मागणी पुरविण्यासाठी किती प्लास्टिकची निर्मिती झाली असेल आणि नंतर वापरलेल्या बाटल्यांमुळे होणारे प्रदूषण वेगळेच.
किमतीचा विचार केला तर त्या दृष्टीनेही हे सुट्टे तेल स्वस्तच पडते. बाजारात पावशेर तेल साधारण ७० रुपयांच्या आसपास मिळते ज्याने दोन बाटल्या पूर्ण भरतात. याच बाटल्यांची विकत घेतानाची किंमत ११३ इतकी होती. आता सांगा, आहे का काही कारण जुन्या बाटलीत नवीन तेल न वापरण्याचं?
वैभव जगताप
#GoBasic #Reuse #Refuse
Comments
Post a Comment